ऑनलाईन औषध विक्री विरोधात मेडिकल बंद जिल्ह्यातील चार हजार मेडिकलधारकांचा बंदमध्ये सहभाग

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):  कुठल्याही कामात अग्रेसर असलेल्या औषध विक्री करणारे संकटात सापडले आहे. यासाठी त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत धाव घेतली, मात्र, त्यांना कुणीही गंभीर दखल घेतली नाही. त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे आता अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच कंपन्याद्वारे अव्यवसायिक स्पर्धेविरोधात औषध विक्रेत्यांचा बंद पुकारला आहे. आज जिल्ह्यातील चार हजार मेडिकलधारकांनी बंद पुकारला आहे.

संघटनेने लोकशाही मार्गाने देशव्यापी बंदचे हत्यार उपसले आहे. यासाठी आज देशव्यापी बंद पुकारला आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच कंपन्यांद्वारे अव्यावसायिक स्पर्धेविरोधात औषध विक्रेत्यांचा बंद पुकारला आहे. केंद्राने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत दि. २८ ऑगस्ट २०१८ अंतर्गत नोटिफिकेशन जारी केले होते. परंतु त्याचे अध्यादेश कायद्यात रूपांतर झाले नसल्याने ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल असून, न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीवर स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. याकडेही सरकार दुर्लक्ष करीत आहे. 

संघटनेने सदरचे जीएसआर रद्द करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर केमिस्ट अंड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष नितिन देशमुख दांडगे, सचिव विनोद  लोहाडे, उपाध्यक्ष नंदकिशोर  काळे, उपाध्यक्ष सागर पाटील, गृह-सचिव  किरण जोशी, सहसचिव ग्रामीण सुनील  देशमुख यानी दिली. राज्यसंघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, राज्यसंघटनेचे सचिव अनिल नांवदर, निखील सारडा, बाबुराव सोनवणे, कपिल टिबडीवाला, शेख अब्दुल रईस, वसंत भराड, हरीष काबरा, सचिन मुगदिया, प्रभू  गिरी, सुरेश  बोरसे, अशोक धस, प्रवीण तिवारी, देवीदास मगर, विनोद ठोंबरे, मराठवाडा झोनचे अध्यक्ष सय्यद इजान, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे सदस्य मनोहर कोरे आदींनी केली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपचा इशारा
केंद्र शासनाने संबंधित विभागाचे मंत्री तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मागूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज औषध वितरकांनी बंद पुकारला आहे. मात्र तरीही मागण्या मान्य नाही झाल्या तर संपूर्ण देशभरात बेमुदत संप पुकारला जाईल. असाही इशारा औषध वितरकांनी दिला आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी टास्क फोर्स; सर्व मेडिकल बंद
अत्यावश्यक सेवेसाठी औषधी भवन येथे टास्क फोर्स तयार केला आहे. त्यात अतिआवश्यक सेवा लागल्यास औषध उपलब्ध करून दिले. इतर सर्व मेडिकल मात्र बंद ठेवले. जिल्हाभरातल्या सर्व मेडिकलने या बंदमध्ये सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील जवळपास चार हजार मेडिकल बंद ठेवले. यामुळे अनेकांना औषधे आज घेता आले नाहीत.